* सन २०१९-२० ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रिवादळामुळे झालेल्या अवेळी पावसाने बाधित ३४
जिल्ह्यातील ३४९ तालुक्यातील इ.१०वी,इ.१२वीच्या विद्यार्थ्यांना – परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती *

* का र्य प ध्द ती *

१. शासन निर्णयानुसार जाहीर झालेल्या ३४ जिल्ह्यांमधील बाधित क्षेत्रातील ३४९ तालुक्यांमधील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०२०’ मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची यादी अनुक्रमे `http://feerefund.mh-ssc.ac.in’ आणि ‘http://feerefund.mh-hsc.ac.in’ ह्या लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahahsscboard.in) प्रसिध्द करण्यात आली आहे.

२. सदर लिंकवर पहिल्या रकान्यात विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्रामध्ये सादर केलेल्या माहितीच्या आधारे, माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव व सांकेतिक क्रमांक (Index Number), विद्यार्थ्याचे नाव, विद्यार्थ्याचे गाव, महसूल मंडळ, तालुका, जिल्हा, विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक, आधार क्रमांक, आवेदनपत्रामधे नमूद केलेला बॅंकखाते क्रमांक, Bank IFSC code अशी माहिती उपलब्ध करुन दिली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी निदर्शनास आल्याने बॅंक खात्याचा तपशील नव्याने मागविण्यात येत आहे.

३. मुख्याध्यापक / प्राचार्य, माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी दुस-या रकान्यामध्ये नमूद केलेले पाच पात्रता निकष तपासून त्यापुढे बरोबर (√) असे दर्शविल्यानंतरच तो विद्यार्थी ह्या योजनेंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी पात्र होणार आहे. अन्यथा सदर विद्यार्थी ह्या योजनेंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीसाठी अपात्र ठरणार आहे.

४. पात्र झालेल्या विद्यार्थ्याच्या नावाखाली “Qualify” दर्शविले जाईल. त्यानंतर सदर विद्यार्थ्याची बॅंक खात्याची माहिती भरण्यास रकाने उपलब्ध (enable) केले जातील. याच पध्दतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांचे निश्चितीकरण करण्यात यावे. ह्या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची सर्व माहिती क्रमाने (बॅंक खाते क्रमांक, Bank IFSC code,MICR code, खातेदाराचे नाव, खातेदाराचा आधार क्रमांक, खातेदाराचे लाभार्थ्याशी नाते इ.) नव्याने भरणे आवश्यक आहे. रकान्यातील सर्व माहिती परिपूर्ण / अचूकपणे भरण्यात यावी.

५. शासन निर्णय दि.१ऑगस्ट, २०१९ मधील अ.क्र.८ नुसार ही योजना स्वयं अर्थसहाय्यीत शाळा वगळता अन्य सर्व म्हणजे शासकीय / खाजगी अनुदानित / विना अनुदानित माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू राहील.

६. ‘Qualified / Disqualified लाभार्थ्यांची यादी प्रमाणित (यादीच्या शेवटी पाच मुद्दे नमूद केले आहेत) केल्यानंतर ‘मुख्याध्यापक / प्राचार्य’ यांनी स्वाक्षरी upload करावयाची आहे. स्वाक्षरी upload केल्यानंतर submit हे बटन उपलब्ध होईल. त्यानुसार बॅंक खात्याचा तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती निर्धारित दि. 15 मार्च, २०२१ अखेर ऑनलाईन पध्दतीने राज्यमंडळास सादर (submit) करावयाची आहे. सदर माहिती ऑनलाइन पध्दतीने राज्यमंडळाकडे प्राप्त होणार आहे.

७. परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत सर्व अभिलेख (प्रमाणपत्र व Annexure ’A’) हे संबंधित माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर जतन करण्यात यावेत.

८. परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्यमंडळ स्तरावरुन NEFT / RTGS द्वारे विद्यार्थ्यांच्या / पालकांच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये वर्ग करण्य़ात येणार असल्याने, सदर माहिती उपलब्ध न झाल्यास सदर लाभापासून विद्यार्थी वंचित राहणार असल्याने परिपूर्ण माहिती निर्धारित कालावधीमध्ये भरण्याची दक्षता घेण्यात यावी.

९. सदर योजना नव्याने कार्यान्वित होत असून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), विभागीय शिक्षण उपसंचालक आणि विभागीय सचिव, विभागीय मंडळ यांनी वैयक्तिक लक्ष घालून विहित कालावधीमध्ये राज्यमंडळाकडे माहिती सादर करणेबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

१०. उपरोक्त सर्व माहिती परिपूर्ण / अचूक भरल्याशिवाय पात्र लाभार्थ्यांना परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वर्ग केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.


• उपरोक्त अ.क्र.१ ते १० मधील सूचनांचे वाचन करण्यात आले असून, त्यातील तपशील समजून घेण्यात आलेला आहे.